मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610
* पुणे पोलीस टाईम्स ऑनलाइन पुणे शहर *
! सिंहगड रोड पोलीस स्टेशन पुणे शहर !
पुणे | प्रतिनिधी :- इम्रान शेख
पुणे शहरातील गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी सिंहगड रोड पोलिसांनी सराईत गुन्हेगारांविरुद्ध कठोर कारवाई केली आहे. वारंवार गंभीर गुन्हे करणाऱ्या राज जागडे याच्यावर महाराष्ट्र झोपडपट्टीदादा, हातभट्टीवाले, औषधद्रव्यविषयक गुन्हेगार, धोकादायक व्यक्ती व दृकश्राव्य कलाकृतींचे विनापरवानगी प्रदर्शन करणाऱ्या व्यक्ती (व्हिडिओ पायरेट्स) यांच्या विघातक कृत्यांना आळा घालण्याबाबतचा अधिनियम (एमपीडीए) अंतर्गत कारवाई करून त्याला नागपूर येथे एक वर्षासाठी स्थानबद्ध करण्यात आले आहे. तर दुसरा सराईत आरोपी सोमनाथ चांदणे याला एक वर्षासाठी पुणे शहर, पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय आणि पुणे जिल्ह्याच्या हद्दीतून तडीपार करण्यात आले आहे.
राज जागडेवर एमपीडीएची कारवाई
राज रविंद्र जागडे (वय २४, रा. आझाद मित्र मंडळाजवळ, चरवडवस्ती, वडगाव बुद्रुक, पुणे) हा सिंहगड रोड पोलीस ठाण्याच्या अभिलेखावरील सराईत गुन्हेगार आहे. त्याच्याविरुद्ध दुखापत करणे आणि नागरिकांमध्ये दहशत निर्माण करणे यांसारखे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. त्याच्या गुन्हेगारी कारवायांना आळा घालण्यासाठी पोलिसांनी एमपीडीए कायद्यानुसार कारवाई केली असून, त्याला नागपूर येथे एक वर्षासाठी स्थानबद्ध करण्यात आले आहे.
सोमनाथ चांदणेला वर्षभरासाठी तडीपार
सोमनाथ भिमा चांदणे (वय २०, रा. रेणुकामाता मंदिराजवळ, वडगाव पठार, वडगाव बुद्रुक, पुणे) याच्याविरुद्धही सिंहगड रोड पोलीस ठाण्यात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. त्यामध्ये दुखापत करणे, विनापरवाना अग्निशस्त्र बाळगणे आणि नागरिकांमध्ये दहशत निर्माण करणे यांसारख्या गुन्ह्यांचा समावेश आहे.
सार्वजनिक शांतता व कायदा-सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलिसांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियमाच्या कलम ५६ (१) (अ) व (ब) अन्वये तडीपारीचा प्रस्ताव तयार करून वरिष्ठांकडे सादर केला. या प्रस्तावाचे अवलोकन केल्यानंतर पोलीस उपआयुक्त, परिमंडळ ३ यांनी आदेश क्रमांक १७/२०२६, दिनांक १३ ऑक्टोबर २०२६ अन्वये सोमनाथ चांदणे याला पुणे शहर पोलीस आयुक्तालय, पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय आणि पुणे जिल्ह्याच्या कार्यक्षेत्रातून एक वर्षासाठी तडीपार करण्याचे आदेश दिले.
वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई
पोलीस उपआयुक्त डॉ. सागर कवडे आणि सिंहगड रोड विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त विजय कुंभार यांच्या सूचनांनुसार, सिंहगड रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनय पाटणकर आणि पोलीस निरीक्षक (गुन्हे) समीर गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.
सर्व्हेलन्स पथकाचे पोलीस उपनिरीक्षक भुपेश साळुंके, पोलीस हवालदार पंकज देशमुख, पोलीस अंमलदार अरविंद धावडे आणि महिला पोलीस शिपाई आश्विनी त्रिभुवन यांनी या कारवाईत महत्त्वाची भूमिका बजावली.
सराईत गुन्हेगारांविरुद्ध करण्यात आलेल्या या कारवाईमुळे गुन्हेगारी प्रवृत्तींना आळा घालण्यास आणि परिसरातील कायदा-सुव्यवस्था राखण्यास मदत होणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.

मुख्य संपादक : – इमरान शेख


























